पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर त्यांनी स्वच्छ भारतासह आणखी एक मंत्र दिला, तो म्हणजे ‘मेक इन इंडिया’. या मंत्राचे अनुसरण करत भारतातील पहिल्या विमानाचा निर्माण महाराष्ट्रात झाला आहे. मुंबई येथील वैमानिक अमोल यादव यांनी कांदिवली येथील आपल्या घराच्या गच्चीवर या विमानाचा निर्माण केला असून सध्या या विमानाची तपासणी धुळे येथील विमानतळावर सुरु आहे. डिसेंबर २०१७ पर्यंत हे विमान उड्डाण करण्याची शक्यता आहे.


२० प्रवासी बसू शकतील असे हे व्यावसायिक विमान असणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे अमोल यादव यांना पालघर येथे ४६ एकर जमीन या विमान निर्मितीच्या कार्यासाठी देण्यात येणार आहे. यादव यांचे विमान टीएसी- ००३ या फेब्रुवारी २०१६ मध्ये झालेल्या मेक इन इंडिया महोत्सवाचे खास आकर्षण ठरले होते. त्यानंतर या विमानाची तपासणी धुळे येथील विमानतळावर द बॉम्बेबे फ्लाइंग क्लबच्या निगराणीत सुरु आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, “या विमानाच्या निर्मितीसाठी आणि उड्डाणासाठी अमोल यादव यांना लागणारी संपूर्ण मदत राज्य सरकारतर्फे करण्यात येईल. कायद्याच्या चाकोरीत बसेल अशी सर्व मदत अमोल यादव यांना मिळेल.” असे आश्वासन दिले.

या विमानाची किंमत इतर विदेशातून मागवलेल्या विमानांपेक्षा नक्कीच कमी असेल. तसेच छोट्या शहरांमध्ये प्रवास करण्यासाठी हे विमान उपयोगी ठरेल. यासाठी नागरिकांना २ हजाराहूनही कमी किंमतीचे तिकीट घ्यावे लागेल. यामुळे पर्यटनाला वाव मिळेल तसेच अधिकाधिक नागरिक या विमानातून प्रवास करु शकतील. असे अमोल यादव यांनी सांगितले.

४० वर्षीय अमोल यादव यांनी कुठल्याही विदेशीवस्तुचा वापर या विमानाच्या निर्मितीसाठी केलेला नाही. अमोल यादव सध्या जेट एयरवेज साठी कार्यरत आहेत. यादव यांनी अमेरिकेतून एरोनॉटिकल इंजीनिअरिंगचे शिक्षण घेतले. शिक्षण जरी विदेशातून घेतले असले, तरी त्याचा आपल्या देशासाठी योग्य वापर करता येतो, हे अमोल यांनी सिद्ध केले आहे.

Source : http://www.mumbaitarunbharat.in/Encyc/2016/12/1/MADE-IN-INDIA-PLANE-BY-AMOL-YADAV-